Translate

तारक मेहता का "सीधा" चश्मा

 

Picture Credit : Google

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेली १३ वर्षे सुरु आहे. मालिकेतली लहान मुलं आता मोठी झाली आहेत आणि ती मुलंही अजून काम करत आहेत. या मालिकेने लोकांचे मनोरंजन तर केलेच, त्याचबरोबर मालिकेतील कलाकारांचं आयुष्यही बनवलं. 


या मालिकाची उत्कृष्टता अशी की या मालिकेने कोणताही चुकीचा संदेश लोकांना दिला नाही. सगळे सण - उत्सव, कला व जल्लोष करुनही कुणाला त्रास न देता साजरे करता येतात हे मालिकेतून अनेकदा दाखवले आहे. या मालिकेने भारतीय संस्कृतीचे प्रतीके अतिशय सकारात्मक पद्धतीने दाखवले आहेत. 


विनोद, मनोरंजन, मानवी स्वभाव, एकमेकांविषयीचा जिव्हाळा, एखादी सोसायटी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. या मालिकेत भिडे या पात्राच्या घरी सावरकराचा फोटो दाखवला तेव्हाच ही मालिका भारतीय तत्वांबद्दल किती प्रामाणिक आहे हे लक्षात आले होते. 


एका एपीसोडमध्ये तर चक्क सावरकरांना मानवंदना देण्यात आली. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे देशात आनंदाचं वातावरण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या देशातल्या वाईट प्रवृत्तीने देशातल्या प्रथा, प्रतिमे ह्यांना बदनाम करण्याचा वा ती प्रतीके बदलून सादर करण्याचा चंग बांधला आहे. 


अगदी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातले सर्वात मोठ्या महान महापुरुष आहेत. पण त्यांना काही जणांनी मराठी व प्रांत, जाती, ब्राह्मण तसेच हिंदुद्वेषापोटी चुकीच्या पद्धतीने सादर केले. खरं तर शिवाजी महाराज हे हिंदुंचे पर्यायाने जगाचे महापुरुष होय. सावरकर म्हणाले होते की सहस्त्रो व्याख्यानांनी जो फरक पडत नाही. तो फरक एका नाटकाने पडतो. मालिका, चित्रपट इत्यादी मधून भारत व भारताच्या प्रतीकांविषयी सकारात्मक चित्रे समोर आली पाहिजेत.


जेणेकरुन येणारी पिढी देशभक्त म्हणून जन्माला येईल. सर्वसामान्य जनतेसाठी देशभक्ती म्हणजे आपलं कर्तव्य वा आपलं काम करत असताना, ते काम केवळ माझ्यापुरते किंवा माझ्या कुटुंबापुरते नसून त्यात देशालाही लाभ होणार आहे ही भावना मनात असणे. सावरकर हे वाईट प्रवृत्तीसाठी अस्पृश्य आहेत.


सावरकांनी पुर्वास्पृश्यांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. त्यांनी सबंध आयुष्यात पुढची किमान ५०० वर्षे लाभ होईल इतके काम करुन ठेवले आहे. आपण नेल्सन मंडेला किंवा व्हिक्टर फ्रॅंकलिन यांची तोंड दुखेस्तोवर स्तुती करतो. या दोन्ही महापुरुषांनी हाल अपेष्टा सहन केल्या तरी त्यांनीज जगाच्या कल्याणाचा हेतू मनात ठेवला. हे दोघे जण महापुरुष होतेच, पण सावरकर या बाबतीत कैक पटीने उजवे वाटतात. 


आपण नेपोलियन आणि अलेक्झेंडरचे गुण गातो. ते महान योद्धे होते. पण भौगोलिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे कैक पटीने महान योद्धे वाटतात. पण भारतीय समाज वाईट प्रवृत्तीला बळी पडला आणि आपल्या प्रतीकांना आपण दूषित वा बदनाम केले. पण आताची तरुण पिढी सुजाण आहे. आता हळूहळू बदल घडतोय. हा बदल पूर्णत्वास नेण्यासाठी सज्जनांनी पुढाकार घेतला पाहिजे. सज्जनंचा धाक हेच वाईट प्रवृत्तीवर बुरशीनाशक म्हणून काम करणार आहे.


तारक मेहता का उल्टा चश्मा असं नाव या मालिकेचं असलं तरी भारतीय समाजाचे उत्तम दर्शन या मालिकेतून घडते म्हणून लोकांना सत्य व सरळ मार्गाकडे प्रवृत्त करणारा हा तारक मेहताचा सीधा चश्मा आहे.  


@ShelarBhagirath