विसंस्कृतीचं दर्शन घडवणारा देश म्हणजे आपला भारत देश. त्यातल्या त्यात आपण भारतीय म्हणजे सण आणि उत्सव प्रिय आहोतच. विविध संस्कृतीने, विविध चालीरीतींनी, धार्मिक रूढी, धार्मिक परंपरांनी नटलेला आपला देश आहे. खान्देशी संस्कृती तर विचारायलाच नको. खान्देश हा प्रांत उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. पूर्वी म्हणे या भागात ‘कान’ नावाच्या राजाचे साम्राज्य होते. म्हणून या भागाची ओळख ‘कानदेश’ अशी होती. कालांतराने कानदेशाचं रूपांतर खान्देश म्हणून झालं असावं किंवा त्याचा अपभ्रंश झाला असावा, असा एक तर्क आहे. काही ठिकाणी तर असेही वाचायला मिळाले की, खान्देशात पूर्वी ‘आहेर’ राजा होऊन गेला आणि त्याच कालावधीत ‘अहिराणी’ भाषेचा उगम झाला. ‘कान्हा’चा म्हणजे कृष्णाचा देश, म्हणून खानदेश असाही अर्थ सांगितला जातो. अर्थात, असे अनेक तर्क-वितर्क, अनेक कल्पना आपल्याला खान्देशाबाबत वाचायला मिळतात. खान्देशात धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा आणि मालेगाव जवळच्या काही प्रांताच समावेश होतो. इथली ‘अहिराणी’ ही बोलीभाषा अतिशय गोड, मधुर आणि खूप रसाळदेखील आहे.
वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे ‘आखाजी’ हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रिय सण! सासरी गेलेली प्रत्येक मुलगी या सणाला आपल्या माहेरी येणार म्हणजे येणारच. आखाजीसाठी आपला भाऊराया आपल्याला घ्यायला केव्हा येणार, याकडे तिचे डोळे लागलेले असतात. ‘रोहिणी’ आणि ‘कृतिका’ ही नक्षत्रे या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त करून देतात. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया या एक महिन्याच्या कालावधीत सर्वत्र वसंत ऋतूचे साम्राज्य असते. झाडे बहरलेली, आकाश निरभ्र असं मस्त वातावरण सर्वत्र बघायला मिळते. अशा वातावरणात सारं काही सकारात्मक असतं आणि म्हणून कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी ‘अक्षय्य तृतीया’सारखा पवित्र दिवस नाही, असं म्हटलं जात असावं. व्यापाराचा शुभारंभ किंवा कोणत्याही प्रकल्पाची सुरुवात म्हणूनच मुद्दाम अक्षय्य तृतीयेला करण्यात येते.
हा सण म्हणजे मुलींचा, महिलांचा आनंदाला उधाण आणणारा सण! चैत्र पौर्णिमेला ‘गौराई’ या देवतेची स्थापना मुली आपल्या घरी करीत असतात. गौराई म्हणजे पार्वती. आखाजीच्या आदल्या दिवशी मुली पारंपरिक पोषाख करून कुंभाराच्या घरी गाणी म्हणत, टिपऱ्या खेळत जातात. कुंभाराने शंकर आणि पार्वतीच्या छान मातीच्या प्रतिकृती बनवलेल्या असतात. पारंपरिक ग्रामीण कलेचा एक उच्च आविष्कार त्यातून पाहायला मिळतो. मुली या मूर्ती वाजतगाजत, गाणी म्हणत अतिशय उल्हसित वातावरणात घरी आणतात. घरात एका कोनाड्यात तिची स्थापना करतात. मनोभावे पूजा करतात. त्या पूजेत कसलीही कसर बाकी राहू दिली जात नाही. गौराईला सांजोऱ्या, शेवया, गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. आखाजीच्या दिवशी गौराईमातेच्या स्नानासाठी नदीवरून, विहिरीवरून, मळ्यातून पाणी आणतात. त्या वेळी गाणीही गात असतात. टिपऱ्या खेळत असतात. डोक्यावर चुंबळ, त्यावर तांब्या, तांब्यात पाणी आणि आंब्याची पाने आणि पारंपरिक गाणी म्हणत या मुली आपल्या घरी परततात.
खान्देशात प्रत्येक सून, सासुरवाशीण आखाजीला आपल्या माहेरी येते. असा एकही पिता नसेल जो आपल्या लेकीला या सणाला घरी आणत नाही. प्रत्येक सासुरवाशीण मुलीला आपल्या माहेरची ओढ या सणासाठी असते. पुढील गाण्याच्या ओळीतला अर्थ बघा. त्या गाण्यात ती भावाची किती आतुरतेने वाट पाहात असते, याचा अंदाज येईल.
‘भाऊ मना टांगाज टांगाज जपुस रे बा
बहीन मनी गय्यर गय्यर रडस रे बा’
या पारंपरिक अहिराणी गीतांचा कर्ता कोण, या गाण्याला कुणी स्वरबद्ध व तालबद्ध केलंय याचा थांगपत्ता नाही. हे वाङ्मय मौखिक स्वरूपातच टिकून आहे. पुढील गीतात गौराईच्या साज शृंगाराचे वर्णन करण्यात आले आहे.
चैत्र वैशाखाचं उन्हं माय, वैशाखाचं उन्हं
खडके तापुनी झाली लाल व माय तापुनी झाली लाल
आईच्या पायी आले फोड व माय पायी आले फोड
आई पायी बेगडी वाव्हन व माय बेगडी वाव्हन...
उत्तर भारतात या कालावधीत या सणाला वेगळं नाव असलं तरी गौरीपूजनाचा 1 महिन्याचा कालावधी येथे गणला जातो. मथुरा, वृंदावन, काशी, द्वारका येथे या सणाला फार महत्त्व आहे. अशी कल्पना कदाचित असावी की, तारुण्यात पदार्पण केलेली गौरी अक्षय्य तृतीयेनंतर श्वशुरगृही पाठवली जाते. हाच कालावधी शुभ मानतात. वसंत ऋतूचे आगमन, फुला-फळांना आलेला बहर. सृष्टीने दिलेले हे वरदानच असते. निसर्गाचा रंगच काही और झालेला असतो. आंब्याचा मोसम म्हणून या दिवशी पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस यांचा नैवेद्य दिला जातो. पुरणाची पोळी हे तर खान्देशच्या लोकांचे अत्यंत मनापासून आवडणारे पक्वान्न. या दिवशी पुरणाच्या पोळीला फार महत्त्व असते. एक मोठे अर्धगोलाकृती मातीचे भांडे ज्याला खापर म्हणतात, त्यावर पुरणाची पोळी करता येणं म्हणजे खऱ्या अर्थाने सुगरण असे समजले जाते. खेड्यातील घरांमध्ये ज्या कोनाड्यात गौराईची स्थापना केली जाते तो कोनाडा विविध रंगांनी सजवला जातो. गौराई सजवण्याची मुलींमध्ये जणू स्पर्धाच लागलेली असते. गौराईला फुलांचा हार वगैरे काही लागत नाही. टरबुजांच्या बियांचा हार, शेंगा, गोडशेव यांचे हार गुंफण गौराईला अर्पण केले जातात. लाकडांची दोन हात असलेली एक साधी सरळ गौराई असते. आंब्याचा मोसम असल्यामुळे कैऱ्यांचा घड, रामफळ गौराई पुढे विशिष्ट पद्धतीने टांगलेले असतात.
उंच व मजबूत झाडांना झोके बांधून तरुण मुली, सासुरवाशिणी, आपल्या विविध रंगी पारंपरिक पोषाखात झोक्यावर गाणी गातात. त्या आपल्याच धुंदीत अगदी मग्न असतात. नऊवारी रंगीत शालू, खान्देशी पद्धतीने अलंकार, केसांचा अंबाडा, नाकात नथ या आपल्या पारंपरिक पोषाखांनी नटून टिपऱ्याच्या तालावर गाणे म्हणत त्यांच्यासह सारा परिसर बेभान होऊन धुंद झालेला असतो. कोणत्याही सणामागे किंवा तो साजरा करण्यामागे काही उद्देश असतात. धार्मिक भावना तर जोपासल्या जातातच; पण या निमित्ताने अनेक कुटुंब एकत्र येऊन गुण्यागोविंदाने, आनंदाने एकमेकांना भेटून आपला आनंद द्विगुणित करतात. अक्षय्य तृतीयेची गाणी खान्देशात खेडोपाडी मुली गातात. विविध प्रकारचे विषय, वर्णन या पारंपरिक गीतांमध्ये असतात. वसंत ऋतूत हवा छान असते. त्यामुळे झोपाळ्यांना उधाण आलेले असते. वृक्ष, वेलीसुद्धा जणू डोलत असतात.
‘आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं.
कैरी तुटनी, खडक फुटना झुय झुय पानी व्हाय वं.
झुय झुय पानी व्हाय तठे कस्साना बजार वं
झुय झुय पानी व्हाय तठे, टिपºयांस्ना बजार वं
माय माले टिपºया ली ठेवजो, ली ठेवजो बंधू ना हाते दी धाडजो’
ही सगळी गाणी म्हणजे लोकगीतांचा, पारंपरिक गीतांचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल.
साती कुंड्यावरी कुंड्यावरी नागीन पसरनी
तठे मनी गवराई, गवराई काय काय इसरनी?
तोडा बिडा काई नई गाडीले,
गाडीले रंग नई, समईले तेल नई
धवया नि पिव्या नंदी, थुई थुई नाचे.
किंवा आणखी हे पुढील गीत बघा.
कायी हेरनं, हेरनं
जांभुय पानी व माय
तठे मनी मायज मायज पानी भरे व माय
किती किती गाणी गातात या मुली? झोक्यावर, फेर धरून, टिपरीच्या तालावर अगदी धम्माल येते या आखाजीच्या सणाला. अक्षय म्हणजे न संपणारे. म्हणून या दिवशी जलकुंभदान करतात. बऱ्याचदा सण साजरे करताना, परंपरा जपताना त्यामागील हेतू समजून घेतले जात नाहीत. त्यामुळे सण साजरे न करणे हे पुरोगामीत्वाचे लक्षण मानण्याची परंपरा आली आहे. त्याऐवजी हे हेतू समजून घेऊन सण साजरे केले तर त्यातला आनंद आणखी किती तरी पटींनी
नक्कीच वाढेल.