काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, ओक्के मदी हाय!!


मस्करी करावीशी वाटत्ये ना ? 

एक आमदार असलेला माणूस 'असल्या भाषेत' बोलतो याची खिल्ली उडवाविशी वाटत्ये ना ? वाटणं साहजिक आहे कारण आपन अजून कधी शेणाने सारवलेल्या जमिनीवर फतकल मारून बसून बुक्कीनी कांदा फोडून लसणीच्या चटणी बरोबर भाकर तुकडा मोडलेला नाही. चामड्याच्या कर्रकर्र करणाऱ्या जड चपला असूनही चिखलातून चालत जात, कुजलेल्या पायानी शेतात केलेली बेणणी पाहिलेली नाही. शेतीची औजारं वापरून वापरून हाताला पडलेले घट्टे आम्हला माहितच नाहीत. घरी आलेल्या पाव्हण्याला या की ssम्हणत बसायला घोंगडं कधी आंथरलेल नाही, आलेल्या पाव्हण्याला बायकोने दोन किमीवरून भरून डोक्यावरून आणलेल्या पाण्याच्या हंड्यातलं तांब्याभर पाणी नी गुळाचा खडा कधी दिलेला नाही. कधी शेतात बैल बसला तर जोत खांद्याला लावत दुसऱ्या बैलाला साथीला घेत पाय भेगाळून जाई पर्यंत शेत नांगरलेल नाही. वावरात पिकलेल्या भाजीपाल्याचा, ज्वारीबाजरीच्या मोटक्याचा वानोळा तुम्ही कधी दिला नाही की तुम्हाला कधी मिळाला नाही. घाटावरच्या ऐन थंडीत आईच्या सुती लुगड्यात लपेटून तुम्ही कधी घोंगडीवर निजलेला नाहीत.

साहजिक आहे आम्हाला त्या रांगड्या, अशुद्ध पण अंत:करणातून आलेल्या शब्दांवर कोट्या कराव्याश्या वाटणं !! 

स्वाभाविक आहे हे कारण रस्त्याने चालायची वेळ आलीच कधी तर शेजारून जाणाऱ्या कारने उडवलेला चिखलाचा एखादा शिंतोडा पॅंटवर पडला तर ओह शीट असे उद्गार आपल्या तोंडून सहज बाहेर पडतात.  नाहीच कळू शकत दुष्काळी भागातून आलेल्या एखाद्या माणसाला इतके निसर्गसौंदर्य बघून वाटत असलेल आश्चर्य.

त्या क्लिपमध्ये आमदार शहाजीबापू पाटील पुढील ओळी देखील म्हणाले आहेत ..

अकरा वेळा निवडून आलेल्या माणसाच्या मतदारसंघात चाळीस वर्ष झटतूय, मेलु मी ! माझ घरबारं बरबाद झालं ! पाटलाची सून आसून माझ्या बायकुला लुगडं नीट मिळंना!! दीडशे एक्कर जमीन विकलिया आज पातुर!! आजुन काय करायचं राहीलया !

पोचतायत भावना ... या खऱ्या कार्यकर्त्याच्या??? जमिनीचा तुकडा विकायला लागणं हे शेतकऱ्याच्या लेखी काळजाचा लचका तोडण्यासारखं असतं हे स्क्वेअर फुटांवर संपत्ती मोजून कोट्यधीश असलेल्यांना काय कळणार ? चाळीस वर्ष झटून काम करणं म्हणजे काय हे कसं समजणार प्रत्येक निवडणुकीला नवीन पक्षात जाणाऱ्यांना ? तुम्हाला खिल्लीच उडवाविशी वाटणार काय डोंगर ची !! 

शहाजीबापूंसारखी अनेक उदाहरणं डोळ्यासमोरून तरळून गेली म्हणून आज शेवटी लिहिलं यावर. एक किरकोळ मागणी आहे हो या रांगड्या गड्याची ... सांगोल्याच्या पाणी योजनेला बाळासाहेबांचे म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे आहे. १४ पत्रं?????!!!! आपल्या पक्षाच्या एका आमदाराने १४ पत्रं लिहूनही मागणी पूर्ण होत नाही???? ल्येकराला पक्षाचा अध्यक्ष नाही हो बनवायला सांगत आहे हा साधा माणूस!! 


असो ... शहाजीबापू ... साला दिल जीत लिया आपने तो !


#ReactingWords

@BhagirathShelar

Post a Comment

Previous Post Next Post