निघून चाललीत माणसं अगदी कुणाचाच निरोप न घेता!
कष्टाने उभं केलेलं आयुष्य,गोडीने जपलेला संसार, चिमुकल्यांच जोडीदाराचं रागावणं, थोरा मोठयांचे आशीर्वाद, कधी कारण होतं म्हणून तर कधी विनाकारणच घातलेला वाद. असूया, द्वेष, तिरस्कार,पैसा,मोह.सगळं सगळे मागे टाकून निघून चाललीत माणसं.
ऑक्सिजनची खालावत जाणारी पातळी पाहून काय वाटत असावं मनाला नेमकं? कुठल्या गोष्टी असतील तेंव्हा प्रकर्षाने आठवणाऱ्या?
नको भांडायला हवं होतं तेव्हा, उगाच बोललोत अपशब्द, उगाच धावत गेलोत इतकं. ती एक ठरवून रद्द केलेली भेट घ्यायला हवी होती!
आईस्क्रीम खायचं होतं मनसोक्त थंडीच्या दिवसात, कोकणात जाऊन एकदा विहरायचं होतं आकाशात निळा समुद्र पायाखाली घेऊन, आवडतील त्या रंगाचे कपडे घालून भटकायचं होतं लोकांचा विचार न करता,म्हणायचं होतं एकदा तिला येस...आय मिस यु टू ! कडकडून मिठी मारायची होती!!
आईला,मुलीला शिकवायची होती सायकल, बायकोला करायची होती मदत तिच्या रोजच्या कामात आणि पाय चेपायचे होते थकलेल्या बाबांचे..तो ऑफिस मधला कलीग वाईट वागलाय आपल्याशी पण तो आजारी होता तेव्हा करायला हवा होता आपण एक फोन..म्हणायला हवं होतं काळजी नको करूस...
किती वर्ष झालीत बोलला नाहीए एक मित्र त्याची घ्यायला हवी होती खबर एकदा तरी. साठवलेल्या पैशांचा बॅलन्स शीट सांभाळताना जगण्याचा बजेट कोलमडत गेला आपला.अगदी मनमुराद ,खळखळून हसायला पण किती दिवस झालीयेत आठवत नाहीए आता या क्षणाला आणि मोकळे रडायलासुद्धा किती बरं दिवस झालीत!
बीचवर नुसतंच चांदणं पीत अख्खी रात्र घालवायची होती तिच्यासोबत.
का कधीच थांबून पाहिलं नाही मावळणाऱ्या सूर्याचं तेज!
का झेलला नाही कधीच पाऊस अंगाखांद्यावर!
का कधीच पायाला लागू दिली नाही माती!
किती सोप्या होत्या या सगळ्याच गोष्टी, सोपं होतं जगणं....
मग का कठीण करत गेलो आपण....का जगणं सोडून धावतच राहीलोत आपण!
ही ऑक्सिजनची पातळी एकदा वर आली ना की सुरुवात करायचीए जगायला...
प्रेम करायला स्वतःवर आणि जगण्यावरसुद्धा!
#तथास्तु
pray for struggling souls.
No comments:
Post a Comment