२००० रुपये भांडवल ते ५०० कोटी रेव्हेन्यू - प्रवास विजय सेल्सचा.
नानू गुप्ता. हे नाव बऱ्याच जणांना माहित नसेल. अनेकजणांना हा थ्रेड वाचून पहिल्यांदा हे नाव माहित होईल. पण याच नानू गुप्तांनी विजय सेल्स सुरु केलं असं सांगितलं तर लिंक लागेल.
तर हे नानू गुप्ता १९५४ साली हरयाणा सोडून मुंबईला नोकरीच्या शोधात आले. आलेल्या माणसाला आपल्यात सामावून घेते तसंच मुंबईने त्यांनाही सामावून घेतलं. शिवणयंत्र आणि फॅन्स बनवणाऱ्या ऊषा कंपनीच्या एका डिस्ट्रिब्युटरकडे नानू सेल्समन म्हणून नोकरी करू लागले.
काही दिवस नोकरी करून नानू कस्टमर लोकांशी कसं बोलायचं, व्यवहार कसे करायचे हे शिकले. ते झाल्यावर आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडली. मित्रांकडून २००० रुपये भांडवल उधार घेऊन माटुंग्यामध्ये एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं .
आणि त्याला नाव दिलं 'विजय सेल्स'. आता नानू स्वतः शिवणयंत्रे, फॅन्स, ट्रान्झिस्टर्स विकू लागले.
प्रॉडक्ट्सला असलेली मागणी आणि नानूंची सचोटी याच्या जोरावर व्यवसाय बहरला. लवकरच नानू थेट कंपन्यांकडून माल उचलू लागले आणि ठरलेल्या काळात त्यांना पेमेंट करू लागले.
यामुळे एरवी मध्ये असणारे डिस्ट्रिब्युटर कमी झाले आणि नानूंना माल तुलनेने स्वस्त मिळू लागला. त्यामुळे इतरांपेक्षा नानू आपल्या ग्राहकांना स्वस्तात प्रॉडक्टस देऊ शकले. साहजिकच त्यांचा खप आणि व्यवसाय वाढत गेला.
याशिवाय एखाद्या कस्टमरला प्रॉडक्टमध्ये काही तक्रार असेल तर नानू स्वतः त्याच्या घरी जाऊन ते बघू लागले. त्यांची ही सर्व्हिस पाहून लोकांना विश्वास बसू लागला आणि हळूहळू विजय सेल्सचे नाव होऊ लागले.
१९७२ मध्ये त्यांनी आपल्या दुकानात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही विक्रीसाठी ठेवला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या बाजूला व्यवसाय वाढतच होता. त्यामुळे नानू यांनी कंपनी रजिस्टर केली आणि १९७६ मध्ये माहीमध्येसुद्धा दुकान सुरु केले.
दरम्यान ऐंशीच्या दशकात भारतात ओनिडा, व्हिडीओकॉन, बीपीएल सारख्या ब्रँड्सने कलर टीव्ही लाँच केले. नानूभाईंना त्यातही व्यवसायाची संधी दिसली आणि त्यांनी कलर टीव्ही आपल्या दुकानात विकायला सुरुवात केली.
हळूहळू विजय सेल्सची बांद्रा, सायन, शिवाजी पार्क या ठिकाणीसुद्धा दुकाने सुरु झाली.
जसजसा काळ पुढे सरकत होता तसेच विजय सेल्समध्ये फ्रिज सारख्या वस्तूसुद्धा विकल्या जाऊ लागल्या. व्यवसायाचा हा सगळा पसारा वाढत वाढत २००७ मध्ये एकूण १४ दुकानांवर जाऊन पोहोचला.
त्याच दरम्यान क्रोमा, रिलायन्स रिटेल, फ्युचर ग्रूपसारखे मोठे प्लेयर या इंडस्ट्रीमध्ये उतरले. बऱ्याच जाणकारांनी नानूभाईंना त्यांचा व्यवसाय यापैकी एखाद्या कंपनीला विकून टाकण्याचा सल्ला दिला.
त्यांनी मात्र हा सल्ला न ऐकता पुणे, सुरत, अहमदाबाद, दिल्ली या ठिकाणी आपली दुकाने सुरु केली. कालानुरूप बदल करत त्यांनी आपल्या दुकानात टीव्ही, फ्रिजबरोबर वॉशिंग मशिन्स, मोबाईल फोन्स, लॅपटॉप यांचीसुद्धा विक्री करायला सुरुवात केली.
विजय सेल्सचा २००० सालातला रेव्हेन्यू १०० कोटी ते २००८ साली ५०० कोटींवर जाऊन पोहोचला. आता हाच रेव्हेन्यू ५००० कोटींपेक्षा जास्त आहे. सध्या विजय सेल्सची देशभरात १०० हुन अधिक दुकाने असून ९ वेअरहाऊस आहेत.
आता सध्याच्या काळात प्रॉफिट मार्जिन कमी असल्याचा फटका विजय सेल्सला सुद्धा बसला आहे. पण एक छोटंसं भाड्याचं दुकान ते आजवरचा एवढा मोठा व्यवसाय ही प्रगती निश्चितच स्तुत्य आहे.
#VijaySales
@ShelarBhagirath
Post a Comment