सोशल मीडिया - The sailent killer...!
मिडिया आणि रिअलटाईम लाईफ यात गल्लत आणि गोंधळ करुन घेतलेल्या तरुणाईत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोशल मिडिया हे खर तर सुखाचे क्षण व्यक्त करण्याचं, विचार, कला, आपला अभ्यास असलेल्या वेगवेगळ्या विषयांवर मतं व्यक्त करण्याच माध्यम आहे. त्यावर दु:खाचा,अडचणींचा किंवा संवेदनशील भावनिक विषयांचा बाजार मांडून त्यावर उत्तर कधीच सापडत नाही. उलट तुमच्या दुखऱ्या बाजूंचा तुम्हाला खिंडीत पकडण्यासाठी कधीही वापर होऊ शकतो. म्हणून जितक्या मोकळेपणाने सोशल मिडियावर व्यक्त व्हाल त्यापेक्षा दहा पट आपल्या खाजगी जीवनाविषयी सावध असायला हवं.
दैनंदिन जीवनात सोबत राहणाऱ्या, वावरणाऱ्या ज्ञात लोकांचे मुखवटे ओळखायला, ते गळून पडायला कित्येक वर्षे लागतात.मग इथे सोशल मीडियावर दीड दिवसांच्या ओळखीला लोकं जीवलग मित्र, काळीज अमुक तमुक वगैरे विशेषणे कशी लावत असतील हे अजून मला न सुटलेले गणित आहे.पाश्चात्य देशातील लोक सोशल मिडिया फक्त करमणूकीचं एक छोटस साधन म्हणून वापरतात. याऊलट भारतात सोशल मिडिया हे जगण्याचं साधन म्हणून वापरणाऱ्या तरुण पिढीत झपाट्याने होणारी वाढ ही चिंताजनक आहे. ज्यांच्याकडे दिवसभरात करायला पुरेशी विधायक कामं असतात त्यांना सोशल मिडियाचं व्यसन बहुदा लागतनाही.पण रिकामे हात आणि रिकामी डोकी या सोशल विळख्यात अलगद अडकतात.
मित्रांनो आयुष्य ९०% जगायचं असत आणि उरलेलं १०% व्यक्त करायचं असतं. आपल्याकडे हे गुणोत्तर उलट आहे. जगण्यातला छोटा भाग म्हणून सोशल मिडिया वापरण्याऐवजी सोशल मिडिया वापरण्यासाठी जगणाऱ्या महाभागांची कमी नाही.यातुन होणारे वाद-प्रतिवाद, हेवेदावे, मान-अपमान हे सगळं वास्तविक वर्च्युअल असले तरी ते निराशेत घेऊन जाण्यासाठी पुरेसे असतात. म्हणून आपले प्राधान्यक्रम ओळखा आणि पोकळ दिखाव्यापेक्षा ठोस कृतीला महत्व द्या. आयुष्य अधिक भरीव, यशस्वी, शांततामय आणि सुंदर होईल.
गेल्या काही वर्षांपासून ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया चा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे.जसे सोशल मीडिया चे चांगला वापर होतो तसें अनेक दुष्परिणाम ही आपल्याला बघायला मिळाले आहेत.
सध्याच्या स्थितीत सोशल मीडियामुळे शांतता आणि स्थैर्य धोक्यात आले आहे. सामाजिक अस्थिरता जाणवू लागली आहे. लोक कृतीपेक्षा मतांवर जास्त भरवसा ठेऊ लागली आहेत. सामाजिक व वैयक्तिक समस्या निराकरण, शिक्षण किंवा थोडीशी करमणूक असा उद्देश जर ठेवला तर काही चुकीचे नाही, परंतु त्या व्यतिरिक्त तासनतास जर चॅटिंग, व्हीडिओ बघत बसण्याच्या सवयींमुळे मात्र अनेकांनी आपली मानसिक स्थिरता गमावली आहे. सोशल मीडिया ही काही वैश्विक समस्या नाही, परंतु तिचा अतिरेक प्रत्येक व्यक्तीसाठी नुकसानदायक ठरू शकतो. त्यामुळे अतिरेक होऊ न देता गरजेपुरता नियंत्रित सोशल मीडियाचा वापर करणेच हितावह आहे. व्यक्तिगत स्तरावर सामाजिक बांधिलकी राखणे आणि त्यामुळे संवाद साधणे गरजेचेच आहे. असा संवाद हा कधी वाद असू नये. समाजाचा कुठलाच घटक त्याद्वारे दुखावला जाऊ नये. जेवढ्या संस्था आणि व्यक्ती सोशल मीडियावर आहेत त्यांच्याद्वारे समाजातील सर्व घटक एकत्र येऊ लागले आहेत. संपूर्ण जग एका व्यासपीठावर आलेले आहे. याचा उपयोग फक्त एखादी समस्या निराकरण आणि निव्वळ मनोरंजन यासाठी झाला पाहिजे. सोशल मीडिया हे आज टीव्हीपेक्षा प्रभावी माध्यम ठरत आहे. इंटरनेटचे जाळे सर्व जगभरात पसरले असताना त्या इंटरनेटचा वापर प्रत्येक व्यक्ती करू लागला आहे. मोबाईल आणि संगणक ही माध्यमे त्यासाठी प्रभावी आहेत ज्यांचा उपयोग आज सर्रास सर्वजण करू लागले आहेत.
आजच्या तरुणाईकडे बघितले तर हातात मोबाईल त्यावर सोशल मीडिया आणि दोनशे अडीचशे रुपयांचा डाटा असला की महिनाभर सर्व काही विसरून सोशल मीडिया चालवणाऱ्या तरुणाईला सर्वच गोष्टीचा विसर पडला आहे. फक्त सोशल मीडिया आणि त्याद्वारे मनोरंजन एवढेच त्यांचे काम ठरले आहे. या सोशल मीडियाने तरुणाचा डोक्यातील रोजगार, नोकरी या गोष्टी विसरून वेगळ्याच दुनियेत रममाण झालेले आहेत. आपले शिक्षण, आपला समाज आहे याचे भानही आहे की नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. सुशिक्षित तरुणांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न गलिच्छ झालेले राजकारण, देशपातळीवरचे प्रश्न यावर चर्चा होताना तर दिसत नाही. याची जाणीवही आजच्या तरुणाईला राहिलेली नाही. शिक्षणाचा फायदा समाजासाठी करून घेण्याची क्षमता युवकांमध्ये आहे ही गोष्ट लोप पावत जात आहे. शिकलेले युवक युवती जागृत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. सोशल मीडियाचा फक्त मनोरंजन म्हणून वापर करून सत्याची जाणीव नसलेली पिढी निर्माण होत आहे आणि यामध्ये मुली आघाडीवर आहेत. कोणत्याही सुविधेचा मर्यादित व योग्य वापर केला तर त्याचा चांगला परिणाम होतो. आजची तरुणाई अमर्यादित आणि अयोग्य वापरच जास्त करून सोशल मीडियाला फक्त मनोरंजनाचे साधन समजून निव्वळ आगाऊपणा सुरू आहे. अनेक प्रकारचे सोशल मीडिया आपल्याकडे आहेत. पण त्यांचा चांगला उपयोग करून घेणाऱ्या तरुणाईची संख्या किती, हा मात्र प्रश्नच आहे.
तरुणाई आज स्वत:च्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, समाजाच्या समस्या, देशाच्या समस्या यापासून खूप दूर आहे किंबहुना हे विषय त्यांच्या डोक्याच्या पलीकडचे आहेत असेच म्हणावे लागेल. सोशल मीडिया आणि कमी दरात जास्त डाटामुळे बेरोजगारी तरुण तर विसरुनच गेला. सोशल मीडिया वापरून मानसिक समाधान हाच त्याचा रोजगार बनला आहे. महिन्याचा डाटा मिळवण्यासाठी कोणाकडून पैसे घ्यायचे याचा विचार अगोदरच डोक्यात असलेल्या तरुणाईला आठ दिवसाचा घरात किराणा कसा आणायचा याचे नियोजन आजही जमलेले नाही. आई वडिलांना स्वत:च्या कमाईमधून औषधी देण्याच्या दिवसात आई वडिलांकडून पैसे घेऊन तंबाखू खाणा-या तरुणांची संख्या कमी नाही. थोडक्यात सोशल मीडियाने बऱ्याच गोष्टीचा आपल्याला विसर पाडलेला आहे. परंतु आजही आपण बघतो काही गोष्टीचा विसर पडणे शक्य नाही अशा गोष्टींवर चर्चा, प्रबोधन होणे गरजेचे आहे जसे जाती व्यवस्था, आंतरजातीय प्रेमामुळे कितीतरी तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे.
बलात्कार, शेतकरी स्वहत्या, असे अनेक प्रश्न आमच्या समोर असताना फेसबुक किंवा टिकटॉक वर किती लोक याविषयी बोलतात? एकिकडे ओरड आहे प्रस्थापित मिडीया सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबतो, सर्व सामान्य लोकांना न्याय मिळू देत नाही. दुसऱ्या बाजुने आम्ही कुठे सोशल मिडियावर पाहिजे तो आवाज उठवतो, आम्ही कुठे सोशल मीडियाचा वापर न्याय मिळवून देण्यासाठी करतो? आम्ही सोशल मीडियाचा वापर माहितीचे दळणवळण होण्यासाठी नाही तर फार फार एकमेकांच्या उचापती करण्यासाठी करतो. महिलावर बलात्कार झाले तर रस्त्यावर येऊन ओरडणारे खूप आहेत, पण त्याच्या हातात असलेल्या सोशल मीडियावर वेगळेच आहेत. आज फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमातून किती लोक जाती व्यवस्था, शेतकरी आत्महत्या, बलात्कार, शिक्षण यावर लिखाण करतात वा जनजागृती करतात याचे उत्तर आहे ‘नगन्य’! कोट्यवधी तरुणाईकडे सोशल मीडिया असताना मोजकेच लोक एखाद्या वेळी सामाजिक पोस्ट टाकतात नाहीतर, सोशल मीडियावर फक्त निव्वळ उथळपणा करतात, हे कशाचे लक्षण आहे? सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात येतो. आपोआप आपल्याला हवे ते मनोरंजन आणि हवी ती कोणत्याही क्षेत्रातील माहिती सहज मोबाईल स्क्रीनवर ओपन होऊ शकते. पण अशा तंत्रज्ञानाचे आणि विशेषकरून सोशल साईट्सचे फायदे आणि नुकसान देखील जाणून घेतले पाहिजेत नाहीतर एका वैज्ञानिक विकासात मानवी क्षमतांचा पूर्ण विनाश होऊन जाईल.
सोशल मीडियामुळे सर्व समाज, लोक एकत्र आले. विचारांची आणि संस्कृतीची देवाणघेवाण शक्य झाली. देशातील व्यक्ती जगात कुठल्याही व्यक्तीशी सहज मैत्री करू लागला. मानवी आणि नैसर्गिक समस्यांचे निराकरण होऊ लागले. एका विचारांचे लोक भारावून जाऊन ग्रुप बनवू लागले मग कृतीसाठी देखील एकत्र येऊ लागले. राजकीय व्यक्ती, अभिनेते, सामाजिक संस्था असे सर्वजण सोशल मीडियावर कार्यरत झाले त्यामुळे त्यांची लोकांपर्यंत झेप वाढली. आपले मत सर्वदूर पसरवता येऊ लागले. वरील फायदे वरवरचे आहेत जर तुम्ही फक्त सोशल साईट्सचा वापर मनोरंजनासाठी करत असाल. असे मनोरंजन मग वेळखाऊ देखील ठरू शकते. पूर्ण दिवस लोक मोबाईल आणि संगणकावर बसून असतात. त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. डोळ्यांचे विकार, पाठदुखी, डोकेदुखी असे विकार जडू शकतात. सोशल मीडिया जास्त फोफावल्यामुळे चुकीच्या बातम्या आणि अफवा यांचा ऊत येऊ लागला आहे. लहान मुले तर संस्कारित न होता मनोरुग्ण होऊ लागली आहेत. लहान वयातच हे माध्यम हाती आल्यामुळे नको तेवढा वापर केला जातो. याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. सायबर चोरीसारखे गुन्हेगार तयार होण्यासाठी हे एक माध्यम/कारण ठरू शकते. हॅकिंगसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे पैसे मिळवण्याचे अनेक गैरमार्ग मुलांना समजू लागले आहेत, जे योग्य नाही. अभ्यास करताना सोशल मीडिया साइट्स चेक करत राहण्यामुळे एकाग्रता भंग पावते. परिणामी, अभ्यासातील लक्ष कमी कमी होत जाताना दिसते. दुसऱ्यांच्या ग्लॅमरस पोस्ट आणि फोटोज पाहून आपल्यालाही ते सुख मिळायला हवं, असं त्यांना वाटू लागतं. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत करण्याची त्यांची तयारी नसते. कोणतीही गोष्ट चटकन आणि सहजासहजी घडावी असे अनेकांना वाटू लागते. सोशल मीडिया एखाद्या दुधारी तलवारीसारखे आहे. याचा योग्य वापर केला, तर फायदा आहे अन्यथा त्याच्या आहारी जाऊन नको ती पावले उचलली, तर आयुष्याची वाट लागायला वेळ लागणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे.
मुलं दिवसभर काय बघतात, कुणाशी बोलतात, काय बोलतात, त्यांच्या गप्पांचे विषय काय असतात, त्यांची स्वप्नं काय आहेत, ध्येयं आहेत का, असलीच तर ती कोणती आहेत, ते ध्येय साध्य करण्यासाठीची इच्छाशक्ती आपल्या मुलांमध्ये आहे का, असलीच तर ती दिसते का, जाणवते का, आपल्या मुलांसमोरचे आदर्श कोणते आहेत, कोणत्या प्रकारचं आयुष्य त्यांना आवड तं, कोणती जीवनशैली आवडते, का आवडते, आपली मुलं कुणाचं अनुकरण करतात, का करतात, त्यांच्यावर कुणाचा प्रभाव आहे, का आहे, पैसा-संपत्ती-स्टेटस यांच्याकडे पाहण्याचा आपल्या मुलांचा दृष्टीकोन कसा आहे, पैशाकडे पाहण्याची त्यांची वृत्ती कशी आहे. या अश्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करा आणि अभ्यास करा.
कोणावरही सहजपणे विश्वास ठेवु नका आणि म्हणूनच कितीही केल तरी हे आभासी जग आहे.. म्हणून सामाजिक माध्यमांचा नेहमी डोळस पणे वापर करा. आणि आंनदी राहा.. 🙏🏻
@BhagirathShelar
#BhagirathShelar
Post a Comment