डॉक्टर्स आणि दवाखाना
आपल्याला ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही, त्याबद्दल काहीच न बोलणे शहाणपणाचे असते. जोपर्यंत त्याचे यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याविषयी मौन पाळणे, आपल्या आणि समोरच्याच्या हिताचे असते.
अर्धवट ज्ञान सर्वांच्याच धोक्याचे असते, परंतु हे अर्धवट ज्ञान माणसाला गप्प बसू देत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
आज कोरोनाच्या महामारीत हेच सर्वत्र दिसून येत आहे. ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातील काहीच माहिती नाही, औषध शास्त्रातले काही समजत नाही किंवा थोडेफार अर्धवट ज्ञान आहे, अशी माणसे नको ते उपचार सुचवत आहेत. काही जणांना कोरोना हा रोग आहे असेच वाटत नाही, काही जणांना हे जागतिक षडयंत्र वाटत आहे, काही जणांना हे राजकीय अपयश लपविण्यासाठी केलेला एक नियोजनबद्ध कट वाटत आहे, तर काहींना नैसर्गिक आपत्ती वाटत आहे, हे सगळं केवळ अर्धवट ज्ञानाद्वारे बाहेर पडत आहे.
असे मेसेज वाचणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दवाखान्यात भयंकर लूट होत आहे, काही अंशी ते घडतही असेल, परंतु प्रामाणिक उपचार करणारी माणसेसुद्धा त्या क्षेत्रात आहेत,आपला जीव आणि कुटुंब धोक्यात टाकून हे योद्धे कोरोना विरुद्ध लढताहेत, हे त्यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही.
कोरोनाने दगावलेल्या माणसाचा मृतदेह गुंडाळून दिला जातो, त्याचे कारण फक्त सुरक्षा एवढेच आहे. त्यातूनही काही लोकांनी चांगल्या माणसांना मारून, त्यांच्या किडन्या आणि काही अवयव काढून घेतले जातात, अशा अफवा पसरवायला सुरुवात केलेली आहे. मोबाईलमुळे अशा अर्धवट ज्ञानाने पसरवलेल्या अफवा रोगापेक्षा जास्त बळी घेत आहेत. मोबाईलमुळे अशा अफवा पसरविणारे व्हिडिओ आणि पोस्ट कमालीचे व्हायरल होत आहेत.
दवाखान्याची अनाठाई भीती निर्माण होऊ लागली आहे. ज्या डॉक्टरांच्या हातात आपले संपूर्ण जीवन आहे, अशा व्यक्तीबद्दल अविश्वास आणि शंका निर्माण होऊ लागली आहे, हे रोगापेक्षाही भयानक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वैद्यकीय क्षेत्र आणि दवाखाना बदनाम होऊ नये आणि त्याबद्दल भीती निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.
परवा मी कोरोनाची टेस्ट घेणाऱ्या एका लॅबोरेटरी जवळून जात होतो, त्या ठिकाणचे चित्र खूपच भयानक वाटले. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशी माणसे हंबरडा फोडून रडत होती. आपण आता जगू शकत नाही अशी त्यांची मानसिकता झाली होती, हे केवळ भीतीच्या वातावरणाचा परिणाम आहे. काही रुग्ण तर दवाखान्यात जाईपर्यंत ठीक असतात आणि दुसऱ्या दिवशी ते गेल्याची बातमी कळते, त्याचे कारण रोगापेक्षा रोगाची भीती हेच आहे.
आपल्याला कोणीतरी औषध देऊन नीट करतोय आणि ज्या दवाखान्यात आपण भरती झालेलो आहोत तो दवाखाना आपल्याला नीट करणार आहे, असा विश्वास दवाखान्या बद्दल आणि डॉक्टरांबद्दल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजपासून ज्या क्षेत्रातील आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्राबद्दल केवळ ऐकिव माहितीच्या आधारे आपण एकही पोस्ट टाकणार नाही, पॉझिटिव आलेल्या रुग्णांमध्ये आणि भीतीच्या सावटाखाली असलेल्या समाजामध्ये भीती निर्माण होईल, असा एकही व्हिडिओ किंवा पोस्ट आपण टाकणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण सर्वजण करूयात.
ज्यासी अपंगिता नाही l त्यासी धरी जो हृदयी ll
दया करणे जे पुत्रासी l तेचि दासा आणि दासीll
तुका म्हणे सांगू किती l तोचि भगवंताची मूर्ती ll
हा भाव डॉक्टरांबद्दल आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे आणि असला पाहिजे.
डॉक्टरांना आणि दवाखान्याला वगळून आपण कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकू शकत नाही, हे कोणीही विसरू नये.
إرسال تعليق