पृथ्वीच्या चारी बाजूने त्रिमितीय अवकाशात पसरलेल्या क्षेत्राला एक स्फियर (Sphere) च्या रूपात इमॅजिन केलं तर त्या अवकाशीय क्षेत्राला खगोलीय भाषेत सॅलॅस्टियल स्फ़ेयर म्हणतात. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करताना सूर्य या सॅलॅस्टियल स्फ़ेयरमध्ये ज्या लंबवर्तुळाकार मार्गातून जाताना दिसतो त्याच्या आठ अंश उत्तर किंवा दक्षिणेकडचं मिळून असलेलं क्षेत्र आणि त्यातली नक्षत्रं म्हणजे आपलं राशीचक्र.
दरवर्षी ही संख्या वाढतच जाते आहे. २०१३मध्ये झालेल्या कुंभ मेळ्यात जवळ जवळ १२ कोटी लोक आले होते. यात गोर-गरीब, शिक्षित अशिक्षित, मध्यमवर्गीय, साधू, संत, संन्यासी, वैरागी, उदासी, गोसावी असे समाजातल्या सर्व स्तरातले धार्मिक लोक येतात. ह्यात जसे धार्मिक श्रद्धाळू असतात तसेच संत संन्याश्यांचे संघटित आखाडे देखील असतात.
भारतात तेरा मुख्य आखाडे आहेत, महानिर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, जूना, आवाहन, अग्नी - हे शैव, निर्वाणी, दिगंबर, निर्मोही हे वैष्णव, आणि बडा पंचायती उदासीन, छोटा पंचायती उदासीन, निर्मल हे शीख. संगठन आणि लॉजिस्टिकल अर्थाने कुंभ मेळ्यांचं सगळ्यात जास्त कौतुक या आखाड्यांना असतं. यांच्याशिवाय काही कोटी लोक जे कुंभाच्या निमित्ताने प्रयाग, हरिद्वार, नाशिक किंवा उज्जैनला जातात त्यांना शाही स्नान आणि आपले पाप धुण्यात इंटरेस्ट असतो. पण या आखाड्यांना या मेळ्यातून नवीन रिक्रुटमेंट करता येते, शक्ती प्रदर्शन करता येतं, अगदी मार्केटिंग सुद्धा करता येते. तसे हे कुंभ मेळे या आखाड्यांसाठी धार्मिक ट्रेड फेयर असतात. इंग्रज यायच्या आधी तर या कुंभमेळ्याचं व्यवस्थापन आणि त्यातून होणारी कर वसुली पण आखाडेच करायचे. एका अर्थाने हे त्यांच्या उत्पन्नाचं साधन होतं. पुढे यातून होणारी आखाड्यांची आपापसातली मारामारी (१७८९च्या नाशिक सिंहस्थात गोसावी आणि वैराग्यांमध्ये झालेल्या मारामारीत बारा हजार लोक मारल्या गेल्याची पेशवे दफ्तरात नोंद आहे) बघून तसेच यातून होणाऱ्या टॅक्स कलेक्शनच्या लालसेने (१८०६च्या प्रयागच्या कुंभ मेळ्यात ब्रिटिशांनी कुंभ मध्ये स्नान करण्यावर १ रुपये कर आकारला होता. त्या काळातले तब्बल एक रुपये) इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला याचे व्यवस्थापन स्वतःच्या हातात घेतले. ते स्वातंत्र्यानंतर सरकारच्या हाती आले.
कुंभ मेळ्याच्या समर्थनार्थ जी लोक कारणं देत आहेत कि कुंभ कोणी आयोजित करत नाही, त्यांनी लक्षात घ्यावं कि उत्तराखंड सरकारची कुंभ आयोजन समिती आहे. त्याचे मुख्य अधिकारी हे एक आयएएस लेव्हलचे सरकारी अधिकारी आहेत. प्रयागला २०२१ मध्ये कुंभ होणार हे खरंतर कितीतरी आधी पासून सरकारी पातळीवर माहिती आहे. कोरोनाची परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याची कल्पना सुद्धा साधारण वर्षभरापासून सर्वांना आहे.
या काळात सर्व आखाड्यांशी समन्वय साधून त्यांना कुंभ मध्ये येण्यापासून परावृत्त करणे, त्या आखाड्यांना त्यांच्या संत, महंत, अनुयायांमध्ये हा मेसेज प्रोऍक्टिव्हली देण्यास लावणे, कुंभ मेळ्याच्या निमित्ताने गंगेत पाप धुवायला येणाऱ्या गोर-गरीब, अशिक्षित लोकांमध्ये जनजागृती करणे, ही सरकारची जवाबदारी होती. पण हे काहीच घडल्याचं दिसून आलं नाही. सर्व-सामान्यांच्या मनात रोष आहे तो त्याबद्दल. महामारी आणि कुंभ मेळा याचं नातं काही नवीन नाहीए. उलट १७८३मध्ये हरिद्वारमध्येच झालेल्या कुंभ मेळ्यात कॉलरामुळे वीस हजार! लोक दगावली होती. त्याहून भयंकर म्हणजे, १८९१च्या कुंभ मेळ्यात परत कॉलराची लागण झाली. कुंभ मेळा संपेपर्यंत एकट्या हरिद्वारमध्ये एक लाख सत्तर हजार लोक कॉलराने दगावली होती. पण हे एवढ्यावरच थांबलं नाही, ही लोक हा कॉलरा भारतभर घेऊन गेली. १८९१मध्ये झालेल्या कॉलराच्या संक्रमणात भारतभरात सात लाखाहून जास्त लोक मेली. त्याहून पुढे जाऊन आपण हा रोग तिथून पंजाब, ते आजचा पाकिस्तान, पुढे अफगाणिस्थान, आणि तिथून रशियापर्यंत पोचवला.
१८८० ते १९४५ या काळात झालेल्या हरिद्वारच्या कुंभ मेळ्यांमध्ये कॉलरामुळे झालेले मृत्यू जवळजवळ आठ लाखांच्या घरात आहेत. हा सगळा इतिहास माहित असताना, कोरोनाचे संकट माहित असताना सरकार जर गेल्या सहा आठ महिन्यात निष्क्रिय राहिली असेल तर खरोखरच भारताला ही चूक फार महागात पडू शकते.
आणि हा प्रश्न फक्त व्यवस्थापनाचाच नाहीए. इथे काही लोकांना म्हणताना बघितलं कि कुंभ मेळ्याचं आयोजन रद्दच करता येत नाही कारण हा उस्फुर्त कार्यक्रम असतो. हे पूर्णपणे अज्ञानातून आलेलं विधान आहे. उलट याआधीही कुंभ मेळ्यांवर महामारीमुळे, अगदी दुसऱ्या महायुद्धामुळे सुद्धा बंदी घातल्या गेलेली आहे. त्यामुळे कुंभ मेळा न घेणं हे काही या वर्षी पहिल्यांदाच घडलं असतं अशातला भाग नाही. दुसरं म्हणजे, तिथे कश्याप्रकारे टेस्टिंग सुरु आहे, कशाप्रकारे सरकार नियंत्रित पद्धतीने हे सगळं हॅन्डल करते आहे असेही काही युक्तिवाद बघितले.
कुंभ मुळे भारतात कोरोना जास्त पसरेल फक्त हीच भीती नाहीए, तर तिथे काही अघटित घडू नये म्हणून सरकारला जे प्रयत्न करावे लागतायत त्यामुळे सिस्टीमवर जो ताण वाढतोय तोही अतिशय अनावश्यक आहे. तिथे लागणाऱ्या टेस्टकिट्स, पीपीई, स्वयंसेवक, कार्यकर्ते, मेडिकल मदत, याची याक्षणी भारताला नितांत आवश्यकता आहे. तिथे आपण कारण नसताना कुंभ मेळ्यासारख्या सद्यस्थितीतील अनावश्यक गोष्टीवर आपले बहुमूल्य रिसोर्सेस अडकवून ठेवतोय.
إرسال تعليق