#friendship_day ❤️😘



Friendship Day, maitri din, मैत्री दिन, मैत्री, मित्र,maitri,friends,freandship, Happy Friendship Day, friend's,
Pic credit : Google


#मैत्रीची_व्याख्याच_होऊ_शकत_नाही 


मैत्री ढोलताशे पिटून फ्रेंडशिप बॅंड बांधून व्यक्त करण्याची बाब नाही, ती अंत:करणातून जोडली जाते. ती जाणून घेण्यासाठी अंतःकरणाचाच मार्ग अनुसरावा लागतो. मैत्री ही निरंतर वाहणार्‍या गंगेसारखी निर्मळ व पवित्र असते.


पहिल्या पावसानंतर येणार्‍या मातीच्या सुगंधासारखी धुंद व हळुवार वार्‍याच्या स्पर्शासारखी सुखद जाणीव देणारी असते. अशा या नात्याला पैशांत तोलणे म्हणजे या निर्मळ व पवित्र संबंधाचा अपमान नव्हे काय?


मैत्रीची व्याख्या व्यक्तिपरत्वे आणि कालानुरूप वेगवेगळी असू शकते.माझ्या मते कुणाला गृहीत न धरता, कुणाच्या आयुष्यात अवाजवी लुडबुड न करता एखाद्याशी अंतःकरणापासून स्नेह जपणे म्हणजे मैत्री!


कदाचित मी थोडाफार अंतर्मुख स्वभावाचा असल्यामुळे स्वतःचा स्पेस जपण्यातून ही व्याख्या तयार झालेली असू शकेल.आपल्याजवळ विनासंकोच मन मोकळे करण्यात एखाद्याला विश्वास वाटायला हवा. अशा विश्वासातून मैत्री जास्त परिपक्व आणि परिपूर्ण होते.


दोन तीन ऐतिहासिक मैत्रीची उदाहरणे आठवत आहेत.


कवी_कलश_आणि_छत्रपती_संभाजी_महाराज : 

मैत्रीचा विषय निघाल्यावर ह्या दोघांचे नाव टाळून पुढे जाता येणार नाही.पराकोटीचा त्याग इतका की मैत्रीसाठी जीवाचीही पर्वा न करता मित्राला खंबीरपणे साथ देणारे मित्र म्हणजे कवी कलश. भले कलशांबद्दल काहीही प्रवाद असोत तरीही त्यांनी संभाजी महाराजांसोबत स्वेच्छेने क्रूर मृत्यू पत्करला ह्यातच सगळे आले. ह्याला खऱ्या अर्थाने जीवाला जीव देणारी मैत्री आपण म्हणू शकतो.


पृथ्वीराज_चौहान_आणि_चांदबरदाई :

पृथ्वीराजांचे बालपणापासून असलेले मित्र चांदबरदाई हे सुद्धा पृथ्वीराजांच्या अखेरपर्यंत त्यांच्या सोबत होते. दिल्लीचे शासक म्हणून नियुक्त झाल्यानंतर पृथ्वीराज ह्यांच्या सहयोगातून त्यांनी पिठूरगडाची निर्मिती केली जी आजही जुन्या दिल्लीत पुराना किल्ला म्हणून प्रसिध्द आहे. महंमद घोरीने आक्रमण केल्यानंतर त्यांनी पृथ्वीराज यांच्यासाठी अनेक राजांकडे मदत मागितली पण कोणीही तयार झाले नाही.पराभव झाल्यानंतर शब्दभेदी बाण मारून घोरीला ठार मारावे हा सल्लाही त्यांनीच पृथ्वीराज चौहान यांना दिला होता आणि पृथ्वीराज यांनीही मित्राचा सल्ला सार्थ ठरविला.


कर्ण_आणि_दुर्योधन : 

प्रारंभी सूतपुत्र म्हणून संभावना झालेल्या कर्णाला दुर्योधनाने अंगदेशाचा राजा बनवून कायमचे त्याच्या उपकाराखाली अंकित करून टाकले. कर्णाच्या वाईट काळात दुर्योधनाने साथ दिली आणि ते दोघे मित्र झाले. आपण चुकीच्या पक्षात आहोत ह्याची कर्णाला जाणीव होती तरी दुर्योधनासोबतची मैत्री त्याने आयुष्यभर जपली आणि युद्धात त्याच्याबाजूने लढत त्यासाठी प्राणही दिला.


मैत्रीही एखाद्या अनमोल रत्नासारखीच असते ज्यावर आनंदाचे,समजूतदारपणाचे,विश्वासाचे पैलू पडले की तिची किंमत आणखी वाढते म्हणून खरी मैत्री जपायला हवी.पैसा येईल आणि जाईल पण खरे मित्र कुठल्याही प्रसंगात तुमच्या सोबत असतात.


'मैत्री' ही काही एक दिवस साजरा करण्याचीही बाब नाही. जीवनातील प्रत्येक क्षण मैत्रीचा सोहळा साजरा करायला हवा. मैत्री ही निस्वार्थ असते. एकमेकांच्या सुख-दुखा:त मेतकुटासारखी मिसळून जाणारी असते. कधी कधी असे वाटते की मैत्रीचा हा अर्थ आजच्या झकपक, दिखाऊ जीवनशैलीत पार हरवल्यागत झाला आहे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज भासायला लागली आहे. 


मैत्रीचं हे नाते देवाने आपल्याला दिलेले एक वरदान आहे. मैत्रीद्वारे जीवनातील सुखाचे आणि दुखाःचे क्षण भोगण्याची आणि सोसण्याची शक्ती दिलेली आहे.देवाच्या भक्तीची किंवा श्रावणातील पावसाची चिंब ओल या नात्यात आहे. मैत्री ही पाण्यासारखी ‍तरल तर लोखंडासारखी मजबूत असते. हे नाते जीवनात येणार्‍या कुठल्याही प्रकारच्या वादळात नेस्तनाबूत होत नाही. उलट प्रत्येक वादळाच्या स्पर्शाने नितळ होऊन सोन्यासारखे उजळत जाते. जागतिकीकरणाच्या या युगात आणि मुक्त विचारधारेत मैत्रीची व्याख्या बदलली आहे.


पुनश्च एकदा सर्वांना #मैत्रीदिनाच्या अनंत शुभेच्छा ❤️🥰



✍️ @BhagirathShelar

Post a Comment

Previous Post Next Post